


कडेगाव : अवैध गौणखनिज वाहतुकीवर प्रशासनाचे घातलेले लगाम आता परिणामकारक ठरत असून, ताब्यात घेतलेल्या २० वाहनांच्या लिलावातून तब्बल १५ लाख ११ हजार रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. सोमवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी या वाहनांची लिलाव प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडली. प्रांताधिकारी रणजित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार अजित शेलार यांनी संपूर्ण कार्यवाही सक्षम, निष्पक्ष आणि शिस्तबद्ध रीतीने पार पाडली. कारवाईनंतर दंड भरण्यास असमर्थ ठरलेल्या १८ वाहनांची लिलावात विक्री करण्यात आली, तर दोन वाहनमालकांनी दंडाची रक्कम भरून आपली वाहने सोडवून घेतली. लिलावाची संपूर्ण प्रक्रिया प्रशासनाने पारदर्शकतेच्या निकषांवर राबवल्याने स्थानिक पातळीवरील प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.