कडेगाव तहसील प्रशासनात डिजिटल युगाची नवी क्रांती सुरू झाली आहे. नागरिकांचा वेळ वाचवून पारदर्शक, कार्यक्षम व उत्तरदायी शासन व्यवस्थेचा आदर्श घालून देत कडेगाव तहसील कार्यालयाने क्यूआर कोडद्वारे निवेदन व तक्रार नोंदणीची सुविधा सुरू केली आहे.
दररोज शेकडो नागरिक कामानिमित्त तहसील कार्यालयात गर्दी करतात. मात्र संबंधित अधिकारी अनुपस्थित असल्याने निवेदन अथवा तक्रार सादर करण्यास अनेकांना अडचणी येत होत्या. ही समस्या संपुष्टात आणण्यासाठी तहसीलदार अजित शेलार यांनी १५० दिवसांच्या विकास कार्यक्रमांतर्गत हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला.
आता नागरिक कुठल्याही ठिकाणाहून फक्त क्यूआर कोड स्कॅन करून आपले नाव, गाव, मोबाईल क्रमांक व तक्रारीचे स्वरूप भरून अर्ज पीडीएफ अथवा फोटो स्वरूपात अपलोड करू शकतात. तक्रार थेट तहसील कार्यालयाच्या नोंदीत नोंदवली जाईल आणि संबंधित अधिकाऱ्यापर्यंत तत्काळ पोहोचेल. या उपक्रमामुळे नागरिकांचा मौल्यवान वेळ वाचेल, कार्यालयीन कार्यक्षमता वाढेल आणि प्रशासनाची पारदर्शकता दृढ होईल, असे तहसिलदार अजित शेलार यांनी सांगितले.

