छ. शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत हा सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. महसूल आणि विभागाच्या आदेशानुसार, या कालावधीत तालुक्यातील वन विविध शासकीय विभागांच्या समन्वयाने अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती तहसीलदार अजित शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शेलार म्हणाले की जिल्हाधिकारी अशोक काकडे व प्रांताधिकारी रणजित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कडेगाव तालुक्यात पहिल्या टप्प्यात पाणंद रस्ते मोहीम (१७ ते २२ सप्टेंबर) राबविण्यात येणार आहे. शेताकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. यावेळी रस्त्यांची दुरुस्ती, शेतजमिनींची मोजणी दुसरा टप्प्यात सर्वांसाठी घर मोहीम (२३ ते २७ सप्टेंबर) राबविण्यात येणार आहे. यामध्ये घरकुलांसाठी पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप करणे, शासकीय जमिनींवरील अतिक्रमित जागांचे नियमन करणे, आणि ग्रामीण तसेच शहरी भागातील पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधणीसाठी आवश्यक असलेल्या परवानगी आणि मंजुरी देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. तिसरा टप्प्यात स्थानिक गरजांवर आधारित नवीन उपक्रम (२८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर) होणार आहेत.
यामध्ये जिल्हाधिकारी आणि स्थानिक महसूल अधिकाऱ्यांच्य मार्गदर्शनाखाली तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन पाणीसंवर्धन, जलसंपदा विकास, आणि पर्यावरण संरक्षण यासारखे नवीन उपक्रम राबविले जाणार असल्याचे तहसीलदार शेलार यांनी सांगितले. यावेळी निवासी नायब तहसीलदार महेश अनारसे, महसूल नायब तहसीलदार वैष्णवी पुजारी निवडणूक नायब तहसीलदार सागर कुलकर्णी, पुरवठा अधिकारी सुनील झाल्टे उपस्थित होते.

