जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार अजित शेलार यांच्या उपस्थितीत कडेगाव तहसील कार्यालयात बुधवारी (दि. १० सप्टेंबर) महसूल लोकअदालत संपन्न झाली.
या लोकअदालतीने शेतकऱ्यांच्या रस्त्यांच्या प्रश्नांना मोठा न्याय मिळवून दिला. लोकअदालतीत तहसील कार्यालयातील २१ व उपविभागीय कार्यालयातील ८ अशी एकूण २९ रस्ता प्रकरणे हाताळण्यात आली. त्यापैकी तहसीलदार यांच्या अखत्यारीतील ८ प्रकरणांमध्ये आपसी समजुतीने तोडगा निघून तब्बल ११६ शेतकऱ्यांच्या अडचणी दूर झाल्या. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक व मानसिक त्रास कमी झाला, वेळ व पैशाची बचत झाली.
या लोकअदालतीत तालुक्यातील २० गावांमधील तब्बल २३० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. कडेगाव तालुका वकील सचिव अॅड. मनोज देशमुख यांच्यासह वकील उपस्थित होते. या लोकअदालतीत शेतकऱ्यांचे वाद आपसी समजुतीने मार्गी लागल्याने ‘प्रशासनाच्या संवेदनशील कार्यपद्धतीचा हा नवा आदर्श असल्याचे मत स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
शेतकऱ्यांचा विश्वास जिंकला
तहसीलदार अजित शेलार म्हणाले, “शेतकऱ्यांच्या समस्या तडजोडीने मार्गी लावणे हीच खरी लोकाभिमुख प्रशासनाची ताकद आहे. लोकअदालतीत केवळ प्रकरणे मिटली नाहीत, तर शेतकऱ्यांचा विश्वास जिंकला गेला आहे. हीच लोकअदालतीची खरी यशोगाथा असून अशा उपक्रमातून प्रशासन व जनतेमध्ये विश्वास, संवाद व सहकार्याची भावना अधिक मजबूत होतील.”




