कडेगाव तहसील कार्यालयात नावीन्यपूर्ण प्रयोग
नागरिक व शेतकऱ्यांचा वेळ वाचवून कार्यक्षम आणि पारदर्शक प्रशासनाची दिशा दाखवत कडेगाव तहसील कार्यालयाने जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि प्रांताधिकारी रणजित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एक नावीन्यपूर्ण पाऊल उचलले आहे. १५० दिवसांच्या विकास कार्यक्रमांतर्गत तहसील कार्यालयात क्यूआर कोडद्वारे निवेदन व तक्रार सादर करण्याची सुविधा सुरू केली आहे, अशी माहिती कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांनी दिली.
यावेळी अजित शेलार म्हणाले, दररोज तहसील कार्यालयात विविध कामांसाठी नागरिकांची गर्दी असते. अनेकदा तक्रार अथवा निवेदन सादर करण्यास अडचणी निर्माण होत होत्या. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून आता नागरिक क्यूआर कोड स्कॅन करून त्यांचे नाव, गाव, मोबाइल क्रमांक आणि तक्रारीचे स्वरूप नमूद करून अर्ज अथवा निवेदन पीडीएफ किंवा फोटो स्वरूपात अपलोड करू शकतात.
आदर्शवत उपक्रम : तहसीलदार कार्यालयाचा हा उपक्रम ‘ई-गव्हर्नन्स’ आणि डिजिटल युगातील प्रशासनाचे आधुनिक स्वरूप आहे. या उपक्रमाचे तालुक्यातील नागरिकांनी स्वागत व कौतुक केले आहे. अजित शेलार, तहसीलदार


