भटक्या विमुक्त जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, परंतु कडेगाव प्रांताधिकारी रणजित भोसले व तहसीलदार अजित शेलार यांनी तडसर (ता. कडेगाव) येथे नंदिवाले वस्तीत घरोघरी स्वतः जाऊन जातीच्या दाखल्याचे वितरण केल्याने या समाजाने प्रांताधिकारी व तहसीलदारांना घोड्यावर बसवून वाजत गाजत त्यांचे स्वागत केले.
कार्यालयीन गतिमानता अभियान दशसुत्री कार्यक्रम अंतर्गत एक अनोखा व अभिनव असा उपक्रम कडेगाव महसूल विभागाने राबविला आहे. तालुका व उपविभागीय स्तरावरील व चक्क लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन भटक्या विमुक्त जातीचे जवळपास ४२ दाखले वितरित केले, त्याचबरोबर अर्जदारांच्या अडचणी समजून घेत, प्रशासनाच्या कामात आणखी सुसूत्रता व गतिमानता आणण्याबाबत सर्वांना आश्वस्थ देखील केले. प्रांताधिकारी व तहसीलदार हे वस्तीवर येताच नंदिवाले समाजाने त्यांना घोड्यावर बसवून हालगी वाजवत वस्तीवर नेले महिला व तरुण मुलांनी त्यांचे स्वागत केले. वस्तीवर अर्जदारांच्या घरी जाऊन त्यांना भटक्या विमुक्त जातीचे प्रमाणपत्र वितरित केल्यामुळे खऱ्या अथनि शासन आपल्या दारी ही संकल्पना या दोन संवेदनशील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात उतरवली आहे. अभिनव उपक्रम राबविण्यात आल्याने महसूल प्रशासनाचे कौतुक होत आहे. यावेळी प्रांताधिकारी रणजित भोसले म्हणाले की, महसूल विभागाची एक वेगळी नाळ सामान्य जनतेशी जोडली गेली आहे. कडेगाव महसूल विभागाच्यावतीने एका दिवसात दाखले देण्याचा उपक्रम यशस्वी करुन दाखवल्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाचला. वेळेत प्रमाणात दाखले मिळाल्याने मुलांना शैक्षणिक प्रवेश व योजनांचा लाभ घेणे सोईस्कर होत आहे.
यावेळी बोलताना तहसीलदार अजित शेलार म्हणाले की, महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा मानला जातो. आपल्या कोणत्याही अडी-अडचणी प्रशासनाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तहसील कार्यालयात कोणत्याही कामासाठी एजंटची गरज लागत नाही. आपली कामे स्वतः घेऊन या त्याचा निपटारा करुन घ्या.
यावेळी जयंत पाटील, सरपंच संजना माळी, सोसायटी चेअरमन प्रवीण पवार, उपसरपंच सूरज पवार, माजी सरपंच हणमंतराव पवार, तलाठी मिलिंद पाटील, गौरव कदम, छत्रपती शिवाजी महाराज मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, संदीप पवार, निलेश चव्हाण, सुभाष जाधव, हणमंत पवार, निवास जाधव, शिवाजी पवार, संजय पवार, राहुल चव्हाण, मनोज यादव, अंकुश चव्हाण, विजय चव्हाण, सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.
भटक्या विमुक्त जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्जदारांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. यासाठी प्रशासनाने स्वतः पुढाकार घेत एका दिवसात सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन जागेवरच आमच्या घरी येऊन दाखले वितरण करण्याचा अभिनव उपक्रम यशस्वी करुन दाखवला आहे. आम्ही महसूल प्रशासनाचे सर्व नंदिवाले समाजाच्यावतीने आभार मानतो. (राजेंद्र जाधव, सामाजिक कार्यकर्ते)

