छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान २०२५ अंतर्गत तालुक्यातील तडसर येथे शेतात जाणारा नकाशावर नसलेला नवीन पाणंद रस्ता खुला करुन त्याची सातबारा आणि गाव नकाशावर नोंद घेण्यात आली.
तहसीलदार अजित शेलार यांनी शेतकऱ्यांच्या संमतीने, महसूल विभागाच्या आदेशाने तसेच विविध न्यायालयांच्या निर्णयानुसार मान्यता मिळालेले सर्व रस्ते खुले करण्याचे आणि त्यावरील अडथळे व अतिक्रमणे दूर करण्याचे आवाहन केले केले होते. त्यानुसार मंडल अधिकारी मनोहर पाटील, तलाठी मिलिंद पाटील यांनी तडसर गावात शेतकऱ्यांची बैठक घेऊन संमतीने शेतजमिनीस रस्ते देण्याचे आवाहन केले. ४० शेतकऱ्यांच्या ७० एकर क्षेत्रास याचा फायदा होणार आहे. मशीनच्या सहाय्याने सुमारे १ कि. मी. रस्ता करण्यात आला आहे.
यावेळी बोलताना तहसीलदार शेलार म्हणाले की, जिल्हाधिकारी अशोक काकडे प्रांताधिकारी, रणजित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात महाराजस्व अभियान प्रभावीपणे राबवले जात आहे. जास्तीत जास्त वहिवाटीतील रस्ते गावच्या नकाशावर आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यावेळी मंडल अधिकारी मनोहर पाटील, तलाठी मिलींद पाटील, माजी उपसरपंच संभाजी शेळके, शिवाजी जाधव उपस्थित होते.


