उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव

कडेगाव येथे कुणबी प्रमाणपत्रांसाठी २८५ प्रस्ताव

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री शंभर दिवस कृती आराखडा उपक्रमाअंतर्गत कडेगाव तहसील कार्यालय येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेले कुणबी जात प्रमाणपत्रांसाठीचे विशेष शिबिर हे कार्यक्षम नियोजन, प्रशासनाच्या लोकाभिमुखतेचे आदर्श उदाहरण ठरले. या शिबिरात कुणबी जात प्रमाणपत्रासाठी तब्बल २८५ नागरिकांनी प्रस्ताव दाखल केले. यावेळी काकडे यांच्याहस्ते जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

काकडे यांच्यासह उपविभागीय अधिकारी रणजित भोसले, तहसीलदार अजित शेलार यांनी मार्गदर्शन केले. निवासी नायब तहसीलदार महेश अनारसे, नायब तहसीलदार वैष्णवी पुजारी व गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे, सहायक पोलिस निरीक्षक संदीप घुगे, महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शिस्तबद्ध नियोजन, सुविधा…

यावेळी प्रत्येक विभागाचे स्वतंत्र माहितीचे फलक लावलेले होते, जेणेकरून नागरिकांना योग्य मार्गदर्शन मिळावे. शिबिरासाठी उभारलेला स्वतंत्र मंडप, मंडलनिहाय टेबल व बसण्याची व्यवस्था यामुळे हा उपक्रम शिस्तबद्धपणे पार पडला.

मोडी वाचकांची उपस्थिती

यावेळी १८६५ ते १९१० या कालखंडातील मोडी लिपीतील जुन्या दस्तऐवजांचे सखोल वाचन करून मिळविलेल्या ६ हजार ४३५ कुणबी नोंदींना या शिबिरात आधार मानण्यात आले. मोडी वाचक मानसिंग कुमठेकर व आशिष शिंदे यांची उपस्थिती हे एक वेगळेपण ठरले.

सुविधांचा लाभ घ्या: काकडे

आपल्या हक्काचे जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शासनाने उचललेले हे पाऊल लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. पात्र लाभार्थ्यांनी पुढे येऊन या सुविधेचा लाभघ्यावा. या शिबिराच्या माध्यमातून कडेगाव महसूल प्रशासनाने जवळून संवाद, त्वरित सेवा आणि ऐतिहासिक आधार या त्रिसूत्रीचा आदर्श नमुना उभा केला आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन काकडे यांनी केले.

Leave a Reply

Scroll to Top

Discover more from उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading