रणजित भोसले यांचा इशारा : कडेगाव तालुक्यात चार पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त
“शेतातील पाणंद व शिव रस्त्यांवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही, तर नियम धाब्यावर बसवून सार्वजनिक मार्ग – अडवणाऱ्यांविरोधात महसूल विभाग कारवाई करणार असून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील. सर्व पाणंद व शिव रस्ते शंभर टक्के अतिक्रमणमुक्त केले जातील,” असा इशारा प्रांताधिकारी रणजित भोसले यांनी दिला आहे. कडेगाव तालुक्यातील सोनकिरे ते पाडळी शिव रस्ता जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणमुक्त करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी रणजित भोसले यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी तहसीलदार अजित शेलार व महसूल कर्मचारी तसेच शेतकरी उपस्थित होते. तहसीलदार अजित शेलार म्हणाले की, कडेगाव तालुक्यात महसूल सप्ताह साजरा होतोय तो केवळ औपचारिकतेपुरता नसून प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनात बदल घडवणारा उपक्रम ठरत आहे. महसूल सप्ताहाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी अशोक काकडे व प्रांताधिकारी रणजित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कडेगाव तालुक्यात तहसील, महसूल विभागाने ठोस पावलं उचलली असून, एकाच दिवसात चार प्रमुख पाणंद व शिव स्त्यांची अतिक्रमणमुक्ती करत त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांसाठी शिवार मार्ग मोकळा झाला असून, पर्यावरणपूरक ग्रामविकासाला गती मिळाली आहे. या मोहिमेत कान्हरवाडी येथील भांडारकी वस्तीकडे जाणारा १ किलोमीटर लांबीचा पाणंद रस्ता, शिवणी ते वांगीदरम्यानचा १ किमीचा जुना मार्ग, कडेगाव ते कडेपूर हा ३ किमी लांबीचा मुख्य रस्ता आणि सोनकीरे ते पाडळी येथील १ किमीचा शिव रस्ता हे रस्ते अतिक्रमणातून मुक्त करण्यात आले. यामुळे दोन हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. रस्त्यांच्या दुतर्फा जांभूळ, नारळ, अशोक, गूळभेडी आदी जातीची झाडे लावण्यात आली. मंडल अधिकारी व तलाठी वगनि झटून काम करत प्रशासनाचे उद्दिष्ट यशस्वी केले.




