तहसीलदार अजित शेलार यांची माहिती : शेतरस्त्यांच्या वादाला मिळणार पूर्णविराम : समजुतीने निघणार तोडगा
आधुनिक यांत्रिकी शेतीसाठी आवश्यक असलेले योग्य आणि रुंद शेतरस्ते ही आजची काळाची गरज आहे. मात्र अतिक्रमण, अडथळे आणि वाद यामुळे अनेक शेतकरी आपल्या शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी अजूनही त्रस्त आहेत. या गंभीर प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम १४३ व मामलेदार कोर्ट अॅक्ट १९०६ चे कलम ५ नुसार शेतकऱ्यांचा कायदेशीर हक्क सुनिश्चित करण्यासाठी महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती कडेगावचे तहसिलदार अजित शेलार यांनी दिली.
यावेळी अजित शेलार म्हणाले महसूल मंत्री यांच्या सूचनेनुसार व जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोक अदालात बुधवार, दि. १० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता तहसिल कार्यालय, कडेगाव येथील सभागृहात होणार आहे. या लोक अदालतीत प्रलंबित असलेले शेतरस्त्यांचे दावे, वाद आणि तक्रारी प्राधान्याने ऐकून घेऊन, आपसात समजुती व तडजोडीच्या माध्यमातून कायमस्वरूपी निपटारा करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असेल.
शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा शेतरस्ता मिळावा आणि शेतीमालाचे वहन तसेच मोठ्या कृषी अवजारांची वाहतूक सुलभव्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. कडेगाव तालुक्यातील प्रलंबित रस्ता केसेस संदर्भात संबंधित सर्व पक्षकारांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, सर्व शेतकरी बांधवांनी आपले रस्ता संदर्भातील वाद मिटवण्यासाठी या लोक अदालतीस उपस्थित राहावे, असे आवाहन तहसिलदार अजित शेलार यांनी केले आहे.





