उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव

प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासन आले दारी

तोंडोली येथे पुनर्वसन शिबीर उत्साहात

वांगमराठवाडी प्रकल्पग्रस्तांच्या विविध अडचणींचे निराकरण थेट त्यांच्या गावी जाऊन करण्याच्या उद्देशाने तोंडोली (कैकताईनगर) येथे विशेष पुनर्वसन शिबीर आयोजित करण्यात आले. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून आणि अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर पार पडले.
उपविभागीय अधिकारी रणजित भोसले आणि तहसीलदार अजित शेलार यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात अनेक लाभांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत तहसीलदार शेलार यांनी केले, तर प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी भोसले यांनी करून शिबिराच्या उद्दिष्टांची माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, प्रकल्पग्रस्त
महिला, वृद्ध, अशिक्षित अशा नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाने स्वतः पुढाकार घेतला असून, कार्यालयात येऊ न शकणाऱ्यांच्या अडचणी त्यांच्या गावीच ऐकून घेतल्या जात आहेत.


या शिबिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेल्या श्रीमती कोमल पुजारी यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी प्रकल्पग्रस्त दिलीप पाटील यांनी नागरिकांच्या समस्या मांडल्या. अनेक प्रकल्पग्रस्तांनी स्वतः उपस्थित राहून आपापल्या अडचणी अधिकाऱ्यांपुढे मांडल्या. जिल्हा पुनर्वसन अधिकारी आर. बी. पोटे यांनी सांगितले की, कडेगाव तालुक्यातील सर्व प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील. मात्र प्रकल्पग्रस्त नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करून प्रशासनाला सहकार्य करावे. यावेळी गटविकास अधिकारी जालिंदर वाजे, भूमी अभिलेख उपअधीक्षक चव्हाण, पाटबंधारे विभाग, लघु पाटबंधारे विभाग, उपजिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालयातील कर्मचारी, संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, सरपंच व ग्रामसेवक तसेच तोंडोली (कैकताईनगर) येथील प्रकल्पग्रस्त नागरिक उपस्थित होते. तहसीलदार अजित शेलार यांनी आभार मानले.


प्रकल्पग्रस्तांना लाभांचे वाटप

या शिबिरात तीन जणांना जमीन वाटप आदेश, दोघाना प्रकल्पग्रस्त दाखले, एक अडथळा प्रकरणाचा निकाल आदेश, वीस जणांना ७/१२ उतारे आणि इतर लाभांचे वितरण करण्यात आले.

Leave a Reply

Scroll to Top

Discover more from उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading