तहसीलदार शेलार : नागरिकांना आवश्यक प्रमाणपत्रे दिली जाणार
“सामान्यांच्या महसूलविषयक, शालेय प्रमाणपत्र, महिला, वृद्ध तसेच नागरिकांना मंडल स्तरावर आयोजित शिबिरातून दैनंदिन व्यवहारात आवश्यक प्रमाणपत्रे देऊन संपूर्ण समाधान करणे हा उदात्त हेतू म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान,” असे प्रतिपादन पलूस-कडेगावचे प्रांताधिकारी रणजित भोसले यांनी येथे व्यक्त केले.
गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण अभियानांतर्गत तहसीलदार कार्यालय व ग्रामपंचायत यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान येथे झाले. वांगी मंडल अंतर्गत समाविष्ट वांगी, वडियेरायबाग, शिवणी, हिंगणगाव खुर्द व रामापूर गावांचा सहभाग होता.
तहसीलदार अजित शेलार म्हणाले, “जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार प्रशासन जेवढे लोकाभिमुख करता येईल तेवढे करण्याचा मानस आहे. मंडल स्तरावर वर्षातून चार वेळा अशा शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे.” सरपंच वंदना सूर्यवंशी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मंडल कार्यालयांतर्गत येणाऱ्या गावांतील सर्व ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सेतू, पुरवठा विभाग, संजय गांधी निराधार योजना, निवडणूक विभाग आदी विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
शिबिरात ७२० वेगवेगळी प्रकरणे दाखल होऊन ११० जातीचे दाखले, अधिवास दाखले, उत्पन्नाचे दाखले, प्रतिज्ञापत्र, अॅग्रीस्टॅक, निवडणूक अर्ज, मंडलाधिकारी दाखले जागेवर वितरित करण्यात आले. मंडलाधिकारी सतीश साळुंखे, ग्राम महसूल अधिकारी गौसमहंमद लांडगे, मास्ती ढोक, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी नेटके संयोजन केले. ‘सोनहिरा’चे उपाध्यक्ष दिलीप सूर्यवंशी, माजी उपसरपंच बाबासाहेब सूर्यवंशी, दाजीराम मोहिते, अरुण पाटणकर यांच्यासह वांगी मंडलमधील समाविष्ट सर्व गावांतील आजी-माजी पदाधिकारी विद्यार्थी, महिला व नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. नारायण चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. उपसरपंच शशिकांत चव्हाण यांनी आभार मानले.
