सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा शल्यचिकित्सक विक्रमसिंह कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कडेगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी अभूतपूर्व असा उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामीण रुग्णालय कडेगाव व तहसिल कार्यालय कडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने १ सप्टेंबर २०२५ रोजी दिव्यांग व आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे.
सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात अस्थिरोग, औषधोपचार, नेत्र, मानसिक व बौद्धिक तसेच बालरोग या पाच महत्त्वाच्या आजारांची तपासणी करण्यात येईल.या शिबिराचा लाभ केवळ १ जुलै २०२५ पूर्वी ऑनलाईन फॉर्म भरलेल्या कडेगाव तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना मिळणार आहे. तथापि, सांगली येथे आधीच तपासणी झालेल्या, १ जुलै नंतर ऑनलाईन फॉर्म भरलेल्या, कायमस्वरूपी डिजिटल प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या तसेच इतर तालुक्यातील दिव्यांगांना या शिबिरात प्रवेश दिला जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आवश्यक कागदपत्रे :- लाभार्थीनी शिबिरात येताना आधार कार्ड, रेशन कार्ड, जन्म/शाळा सोडल्याचा दाखला यांसह महिलांसाठी लग्नानंतर नाव बदलाचा पुरावा बरोबर आणणे बंधनकारक आहे. सर्व कागदपत्रांची मूळ प्रत व एक झेरॉक्स प्रत आवश्यक असेल.
माहिती व मार्गदर्शन कक्ष
या शिबिरातच संजय गांधी व इंदिरा गांधी योजना याबाबत नव्याने दिव्यांग ठरलेल्या व्यक्तींना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र माहिती कक्ष उभारण्यात येणार आहे. तहसिल कार्यालय व सेतु विभागाचे अधिकारी यासाठी उपस्थित राहतील.
शिबिराचा लाभ घ्यावा : तहसीलदार अजित शेलार यांचे आवाहन
कडेगाव तालुक्यातील पात्र दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन कडेगावचे तहसिलदार अजित शेलार यांनी केले आहे.


