पूर्वीच्या काळी बरेच शेतकरी सावकार व इतर खाजगी व्यक्तींकडून हात उसनवारीने कर्ज रक्कम उचल करीत असत. सदर रक्कमेस तारण म्हणून बिना ताब्याने शेतजमिन गहाण ठेवून त्याबाबत नजर गहाण घेणार (न.ग.घे.) अशा नोंदी केल्या. यात शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत कडेगाव तहसीलदार अजित शेलार यांनी ६८६ गटातील तगाई कर्ज बोजा उतरवला तर एक हजार उताऱ्यावर लक्ष्मीमुक्ती योजनेतून महिलांची नावे नोंदवली आहेत.
कडेगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या ७/१२ च्या इतर हक्कात गेली ४० वर्षापासून नजर गहाण नोंद होती. उसनवार रकमेची परतफेड केल्यानंतर नजर गहाण ठेवलेल्या शेतजमिनीच्या इतर
हक्कातील नजर गहाणचा बोजा कमी होणे आवश्यक होते. परंतु सदरचे बोजे आजही काही ७/१२ वर कायम राहिले होते. ते कमी करण्यासाठी तहसीलदार अजित शेलार यांनी आवाहन केल्यानंतर तलाठी यांच्यामार्फत ६८६ शेतकऱ्यांकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जासोबत उपलब्ध जुने ७/१२ व फेरफार घेऊन बोजे कमी करण्यात आले आहेत.
१९७१ साली शासनाने शेती सुधारणेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यात शेतीला बांध घालणे, जमीन सपाटीकरण करुन पावसाचे पाणी शेतातच जिरवणे व शेती अधिक उत्पादनक्षम बनविणे हा प्रामुख्याने उद्देश होता. त्या अनुषंगाने शासनाने महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात कृषी खात्याचे मृदसंधारण विभागाने (बंडींग खाते) प्रत्येक गटाच्या सिमांकनानुसार बांध घालण्याची कार्यवाही केली होती. त्यासंबंधीचा येणारा खर्च शेतकऱ्यांकडून घेण्यात येत होता. शासनाकडून
शेती, जमीन सुधारणासाठी विहीर, तगाई, बैलतगाई, चारातगाई, खावटी तगाई, ऑईल इंजिन तगाई, घर बांधणे तगाई, जळीत तगाई, बी बियाणे तगाई देण्यात आल्या होत्या. सदर विविध तगाईची परतफेड करण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना हफ्ते ठरवून दिलेले होते.
त्याची नोंद ७/१२ च्या इतर हक्कात वेळोवेळी घेण्यात आली होती. त्यापैकी काही शेतकऱ्यांनी कर्जाची फेड करुन निर्बोजचा दाखला प्राप्त करुन इतर हक्कातील बोजे कमी करुन घेतले होते. शासनाने देखील वेळोवेळी तगाई कर्ज माफ केले होते परंतु काही शेतकऱ्यांच्या उतारावर बोजे कायम होते. ते ही आता कमी झाले आहेत.
तालुक्यात लक्ष्मीमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात महसूल प्रशासनास यश आले आहे ५८५ महिलांच्या नावे एक हजार एक गट करण्यात आला आहेत. १८५ गटातील एकत्र कुटुंब मॅनेजर नावे कमी करुन वारस शोधून त्यांची नावे नोंदवली गेली आहेत. ३६२ अज्ञान पालक नोंदी कमी करुन आता सज्ञान शेतकरी उताऱ्यावर आले आहेत. तालुक्यातील ४०५ मयत खातेदार यांच्या १ हजार ८२९ गटात वारसांच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या सर्व बाबींसाठी शेतकऱ्यांना एक रुपया खर्च नाही व कार्यालयात हेलपाटेही मारावे लागले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाचे आभार मानले आहेत.
शासनाच्या विविध योजना कडेगांव तालुक्यात प्रभावीपने राबवल्या जात आहेत याचा नागरिकांनी लाभ घ्यावा महसुल प्रशासनाच्या वतीने तालुक्यात विविध शिबीर घेण्यात आली आहेत याचा लाभ अनेकांना झाला आहे. शेतकऱ्यांनी एकुम्या, अपाक कमी करण्यासाठी तलाठी यांच्याकडे अर्ज करावा