कडेगाव वांगी (ता. कडेगाव) येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांतर्गत ‘गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण’ या हेतूने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वांगी येथे महसूल मंडल स्तरावर विविध दाखल्यांचे व शासनाच्या योजनांची तात्काळ पूर्तता करून लोकांचे प्रश्न तडीस लावण्यात आले.
यावेळी तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्या स्तरावरील सुमारे ७२० विविध प्रकारचे दाखले तात्काळ वितरित करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने जातीचे दाखले, नॉनक्रिमिलेअर, डोमासिल, उत्पन्न, प्रतिज्ञापत्र यांचा समावेश आहे.
शिबिराचे उद्घाटन प्रांताधिकारी रणजित भोसले यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी तहसीलदार अजित शेलार, सरपंच वंदना सूर्यवंशी, मंडल अधिकारी सतीश साळुंखे, सोनहिरा कारखान्याचे व्हा. चेअरमन दिलीपराव सूर्यवंशी, उपसरपंच शशिकांत चव्हाण, नायब तहसीलदार वैष्णवी पुजारी, पुरवठा अधिकारी त्रिवेणी गुरव आदी उपस्थित होते.
प्रांताधिकारी रणजित भोसले म्हणाले, जास्तीत जास्त लोकांना शासनाच्या योजनांचा लाभ सहजतेने
मिळावा या हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल विभागाच्या काही अडचणी असल्यास लोकांनी त्याचे समाधान करून घ्यावे, या मेळाव्याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ करून समाधानाने घरी जावा असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
तहसीलदार अजित शेलार म्हणाले, समाधान मेळावा हा प्रत्येक महसूल मंडलात लोकाभिमुख सेवा तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी हा मेळावा असून यापुढे प्रत्येक मंडलात वर्षातून चार वेळा अशा मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले, यावेळी विविध दाखल्यांच्या सोबत कृषी, ग्रामपंचायत, पंचायत समिती, महसूल, पुरवठा विभाग, निवडणूक, संजय गांधी यांसह शासनाच्या सर्व योजनांची लाभार्थ्यांना एका जागेवर अंमलबजावणी करून देण्यात येणार
असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
स्वागत वांगीच्या सरपंच वंदना सूर्यवंशी यांनी केले. यावेळी माजी उपसरपंच बाबासो सूर्यवंशी, जोतिर्लिंग पतसंस्थेचे चेअरमन अरुण पाटणकर, माजी उपसरपंच प्राजक्ता कदम, धनाजी सूर्यवंशी, हबीब पटवेकरी, अविनाश औंधे, बुवाजी देशमुख, रामचंद्र शिंदे, मारुती मोकळे आदी उपस्थित होते. सूत्र संचालन नारायण चव्हाण यांनी केले, आभार शशिकांत चव्हाण यांनी मानले.
